महाविकास आघाडीत अनेक दिग्गज निवडणुकीसाठी इच्छुक..
संगिनी न्यूज (रवी ढुमणे)
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षातील अनेक दिग्गज्यानी गावागावात जाऊन भेटीगाठी सुरू केल्या आहेत. सध्यातरी संजय खाडे यांनी कंबर कसल्याचे बघायला मिळते आहे. यातच काँग्रेस पक्षाने पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिका स्पष्ट केली आहे. तरीसुद्धा माजी आमदार वामनराव कासावार यांची भूमिका निर्णायक असणार आहे. यात प्रा.टिकाराम कोंगरे, हे सुद्धा प्रयत्नात आहे. आता महाविकास आघाडीची उमेदवारी काँग्रेस ला जाणार की शिवसेना(उ.बा.ठा.) ला जाणार हे बघणे महत्वाचे आहे.
नेत्यांचे गावागावात दौरे वाढले.
वणी विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार आहेत. गेल्या १० वर्षात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नसल्याचे बघायला मिळाले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप वणी मतदारसंघात माघरली असल्याने त्यांच्या पक्षात सुद्धा बलाढ्य दावेदार विजय चोरडिया,तारेंद्र बोर्डे यांनीही दंड थोपटल्याची जोरदार चर्चा आहे. विजय चोरडिया यांनी विद्यमान आमदार यांच्यापुढे जणू आव्हानच उभे केले आहे. परिणामी भाजप विद्यमान आमदारांना डच्चू देणार की काय असा प्रश्न उपस्थित होते आहे.
तर दुसरीकडे काँग्रेसचे तरुण दावेदार संजय खाडे उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. गावागावात भेटीगाठी, गाव स्तरावर विविध उपक्रम राबविण्यात सुरुवात केली आहे. विद्यमान खासदारांच्या मर्जीतील असल्याने उमेदवारी मलाच मिळणार असा दावा सुद्धा खाडे यांनी केला आहे. सध्यातरी संजय खाडे यांची चर्चा सर्वत्र रंगताना दिसते आहे.
सोबतच माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी यवतमाळ जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे सुद्धा विधानसभेची निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यांनीही भेटीगाठी सुरू केल्या आहेत. वरिष्ठ स्तरावर कोंगरे यांची पकड मजबूत आहे. परिणामी त्यांनी सुद्धा निवडणूक लढण्याचे सूतोवाच केले आहे. यातच माजी आमदार वामनराव कासावार यांचाही गट मोठा असल्याने त्यांची भूमिका महत्वाची असणार आहे.
२३ जुलै ला काँग्रेस पक्षाने पत्रकार परिषद घेऊन शासनाच्या दडपशाही धोरणाविरुद्ध एल्गार पुकारला आहे. प्रसंगी वसंत जिनिंग चे अध्यक्ष आशिष खुलसंगे यांनी पक्षाने उमेदवारी दिली तर विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे सांगितले आहे. आता वणी विधानसभेची जागा काँग्रेसला जाणार की, शिवसेनेला यावर सर्व काही अवलंबून आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांची रणधुमाळी
सध्या महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेस पक्षाचे नेते, अन शिवसेना नेत्यांची परिसरात रणधुमाळी चालू असल्याचे बघायला मिळते आहे. आता या रणधुमाळीत कोण बाजी मारेल ही येणारी वेळच ठरविणार आहे. लोकसभेचा निकाल बघता जनतेचा कौल महाविकास आघाडीच्या बाजूने वळला असल्याचे चित्र आहे.
भाजपचे विजय चोरडिया यांनी थोपटले दंड
विद्यमान आमदारांचा कार्यकाळ बघता शेतकऱ्यांच्या अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. त्याचे निराकरण न झाल्याने विजय चोरडिया यांनी विद्यमान आमदारापुढे जणू आव्हान उभे केले आहे. जनतेच्या सेवेसाठी भाजपकडे उमेदवारी मागणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. वरिष्ठ पातळीवर चोरडिया यांचे संबंध असल्याने येणारी निवडणूक चांगलीच रंगणार असल्याचे चित्र सध्यातरी दिसायला लागले आहे.
आता महाविकास आघाडी व महायुती कोणाला उमेदवारी देणार हे बघणे औत्सुक्याचे असल्याने कार्यकर्ते मात्र आमच्याच नेत्याला उमेदवारी मिळणार असे बोलतांना दिसते आहे.

